प्रयोग मालाड संस्थेबद्दल | About Prayog Malad
ज्ञान, सेवा, कला व क्रीडा क्षेत्रातील विविध समाजसेवी उपक्रम अंगिकारणारी ”प्रयोग मालाड” ही उपनगरातील एक मान्यवर संस्था आहे.
१९७८ सालीस्थापन झालेल्या या संस्थेने प्रारंभीच्या काळात पथनाट्य, गच्चीनाट्य ( टेरेस शो), विविध एकांकिका स्पर्धा, तसेच महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार मिळवून मुंबईतील प्रायोगिक नाट्य चळवळीमध्ये आपला स्वतंत्र ठसा उमटविलेला आहे.
वैद्यकीय चिकित्सा शिबिरांच्या भव्य आयोजनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेचे नाव मानाने घेतले जाते. १९८० ते १९८५ काळात मुंबई, लांजा-रत्नागिरी, चोपडा-जळगाव आणि वरुड-अमरावती येथे आयोजिण्यात आलेल्या भव्य वैद्यकीय शिबिरांत रुग्णांना मोठ्या प्रमाणात औषध व गोळ्यांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. रुग्णसेवेच्या या पवित्र कार्यात के.ई.एम्. रुग्णालयातील अनेक तज्ञ डॉक्टरांचा मोलाचा सहभाग लाभला.
आंतरशालेय बुद्धीकसोटी स्पर्धा, आतंर-महाविद्यालयीन वैयक्तिक अभिनय स्पर्धा, छायाचित्र-भिंन्तिपत्रके स्पर्धा आणि रंगावली प्रदर्शन आदी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, एड्स, मतीमंद-विकलांग बालके आदी विषयांबाबत जनजागृती व जन प्रबोधानाचे कार्य संस्थेतर्फे प्रतिवर्षी हाती घेण्यात येते.
खो-खो बरोबरच मल्लखांब या भारतीय खेळाचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने या खेळांचे तंत्रशुद्ध शिक्षण देणारे उपनगरातील पहिले प्रशिक्षण केंद्रसंस्थेतर्फे सुरु करण्यात आले आणि त्यास पालक आणि विद्यार्थांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १९९८ साली भव्य सोहळ्यात संपन्न झालेली राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धा आणि मल्लखांब निवड स्पर्धा संस्थेच्या आजवरच्या दर्जेदार परंपरेला साजेशीच होती. संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षित खेळाडूंनी विविध राज्यस्तरीय आणि आंतरराज्य स्पर्धांमध्ये उच्च दर्जाच्या प्राविण्याचे प्रदर्शन करून देशभरात संस्थेची प्रतिष्ठा वाढविलेली आहे.
(संस्था नोंदणी क्रमांक: BOM 232/78 GB BSD) Bombay Public Trust Act 1950 Reg. No. F- 4967 Mumbai